ह्बलची दुर्बिण/स्फोट
इथे एकच आहे ब्रह्म | बाकीचा सगळा भ्रम ||? ९९६|१८|ज्ञा.
झाडावरचे सफरचंद जमिनीवर पडते. ते देठापासून सुटल्यावर आकाशात उडून जात नाही हे सगळ्यांनीच बघितले होते पंरतु हे पृथ्वीवर पडणे गुरुत्वाकर्षणामुळे होते हे न्यूटनला आणि त्याच्या आधी इतरांनाही उमगले होते. खरे तर प्रत्येक वस्तूला गुरुत्वाकर्षण असतेच असते आणि म्हणूनच सफरचंद सुद्धा पृथ्वीला खेचते परंतु ते पृथ्वीच्या मानाने अगदीच किरकोळ असल्यामुळे पृथ्वीवर सफरचंदाचा अगदीच क्षुल्लक परिणाम होतो. तो आपल्याला दिसूही शकत नाही. गुरुत्वाकर्षण हे प्रकरण जर अशा तऱ्हेने सर्व वस्तूत आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवर आपटून त्यांचा चक्काचूर का होत नाही असा प्रश्न विचारता येतो. उदाहरणार्थ पृथ्वी सूर्यावर का आपटत नाही तर त्याचे उत्तर असे देण्यात येते की पृथ्वी वेगाने कोठेतरी जाते आहे. सूर्य तिला खेचतो आहे पण तिचा मूळ वेग प्रचंड असल्यामुळे ती सूर्याच्या कह्यात आहे परंतु तिचे समर्पण सूर्यात होईल अशी स्थिति नाही. म्हणूनच तिचे सूर्यभ्रमण लंबवर्तुळाकार आहे. ह्याच्यातला लंब, तिचा वेग किंवा जाण्याची दिशा दाखवतो. आणि शेवटी लंबवर्तुळाकार भ्रमण व्हावे लागते कारण सूर्य तिची पाठ सोडत नाही. हा पृथ्वीचा वेग आला कोठून? न्यूटन गेल्यानंतर दोनशे वर्षांनी लेमेत्र नावाच्या धर्मगुरूने एकदा आकाशाकडे दुर्बिण वळवून निरीक्षणे सुरवात केली तेव्हा आकाशातल्या वस्तू एकमेकांपासून दूर पळून जात आहेत असे एक दृष्य त्याला दिसले. तेव्हाच त्याने “बहुतेक सगळ्या विश्वातल्या वस्तू विश्वाच्या केंद्रापासून दूर जात आहेत किंवा असणार” असे अनुमान नोंदवले होते आणि म्हणूनच विश्वाच्या प्रारंभी एक मोठा स्फोट झाला आणि ज्या अनेक ठिकऱ्या उडाल्या त्या ठिकऱ्या म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या विश्वातल्या वस्तू असा एक कयास करण्यात आला. पुढे म्हणजे हली हल्ली ह्बलची दुर्बिण आली आणि विश्वातल्या सर्व वस्तू खरोखरच दूर दूर जात आहेत ह्यावर शिक्का मोर्तब झाले. न्यूटनने लावलेला आणखी एक महत्वाचा शोध म्हणजे पांढऱ्या प्रकाशातला सात रंगी वर्णपट. हे रंग बघण्यासाठीच्या यंत्राला स्पेक्ट्रोस्कोप म्हणतात. ह्या यंत्राच्या मदतीने प्रत्येक वस्तूचा वर्णपट रेखाटता येतो. विश्वातल्या वस्तूंचे जेव्हा रेखाटन सुरु झाले तेव्हा काही ठराविकच वस्तूचे दर्शन घडू लागले. तेव्हा ह्या वस्तूंचा पूर्वज एकच असणार असे अनुमान सहाजिकच प्राप्त झाले. ह्या आपल्या पूर्वजाला आपल्यातले काही ब्रह्म म्हणतात आणि ते पसरले आणि त्यातूनच सारे घडले म्हणून खरे सत्त्य ब्रह्मच आहे असे म्हटले जाते. बाकीचा सगळा भ्रम आहे किंवा कसे त्याबद्दल ही लेखमाला आहे.