Maharashtra Mandal of Victoria Vidnyaneshwaree Vidnyaneshwaree – Chapter 2

Vidnyaneshwaree – Chapter 2

बडबड?

तोंडेसि तोंडा ना पडे | बोलेसि बोला न घडे | एया गुंती बडबडे | त्राये झाली ||१७|१३|ज्ञा.

विश्वाचे रहस्य उलगडतांना कसे वादविवाद झाले ह्याचे हे ज्ञानेश्वरीतील वर्णन आहे.

विश्वाचे वय १४ अब्ज वर्षे इतके आहे. अशी हल्लीची धारणा आहे. त्यामानाने शेती सुरु होऊन केवळ १०,००० वर्षे झाली हे आधी ध्यानात घ्यावे लागते. जे आपोआप उगवते ते खाऊन पोट भरण्याऐवजी, स्वतः पेरावे मग जे उगवेल ते साठवून पुरवून खावे म्हणजे शेती. माणसाने शोधून काढलेली ही क्लुप्ति तो स्थायिक होण्यास कारणीभूत ठरली. त्या आधी तो भटक्या होता. स्थैर्य आल्यावर त्याला उसंत मिळाली आणि तो विचार करू लागला तेव्हा संस्कृती निर्माण होऊ लागली असे म्हटले जाते. पहिली पाच सात हजार वर्षे निसर्ग हीच देवता ह्या समजूतीत गेली. काही विशिष्ठ देव देवतांचाही हा काळ होता. काही देव रागीट होते तर काही मोठे सोज्वळ. त्या देवांना संतुष्ट ठेवणे हाच एक उद्योग होता. मग धर्म निर्माण झाले आणि त्यात सुसंगत (!) कारणमीमांसा देत हे विश्व आणि माणूसजात कशी निर्माण झाली आणि ह्या विश्वातल्या माणसाला तरणोपाय काय ह्या बद्दल विवेचन सुरु झाले. मध्य पूर्वेतल्या धर्मांमधे (यहुदी ख्रिश्चन आणि इस्लाम) ह्या विश्वाला कर्ता आहे त्याला मन आणि बुद्धी आहेत आणि हे विश्व त्याने हेतु:पूर्वक निर्माण केले आहे. असा विचार आहे. भारतातल्या धर्मांमध्ये जास्त विविधता आहे. हे विश्व निर्माण झालेले नाही ते अनादि अनंत कालापासून अस्तित्वात आहे असे जैन धर्माचे म्हणणे आहे. हे विश्व निर्माण कसे झाले ह्याची चर्चा बाजूला ठेवा ह्या जगात जे घडते त्या घडामोडीत माणसाने स्वतःला कसे उन्नत करावे ह्यावर लक्ष ठेवा असे बुद्धधर्माचे म्हणणे आहे. ह्या वरील धारणांना छेद देणारे विचार पृथ्वीच्या पाठीवर दोन ठिकाणी निर्माण झाले. एक ग्रीस मधे आणि दुसरे भारतात. ख्रिस्तपूर्व सुमारे पाचशे वर्षापूर्वी अॅनाक्झिमांडर ह्याने” हे विश्व एका अमर्याद त्रिकाला बाधित तत्वा पासून निर्माण झाले आहे. त्यातील पुढची उत्पादने उदा. अग्नी पाणी किंवा माती समतोल साधत एकोप्याने राहतात आणि म्हणूनच ह्या विश्वाला तर्काद्वारे न्याहाळता येते. आणि इथल्या घडामोडीत सुसंगतता म्हणजेच न्याय आहे असे त्याचे म्हणणे होते”. भारतात ह्या विषयी काय म्हटले गेले तेपुढे. परंतु ज्ञानेश्वरीतला जवळजवळ पहिलाच शब्द ‘आद्या’ आहे. त्याला विश्वकर्ता म्हटलेले नाही हे ध्यानात घेतलेले बरे. आद्या शब्द गीतेत नाही.

Related Post